राजू शेट्टींचे मानेंसमोर तगडे आव्हान
हातकणंगले – खासदार निवेदिता मानेंच्या कामकाजाबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी आणि “बदल हवा’ या भूमिकेतून आमदार राजू शेट्टी यांच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरवातीला श्रीमती माने यांना एकतर्फी वाटणारी निवडणूक तितकीशी सोपी नसल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली असून माने यांच्या विजयाचा मार्ग खडतर असल्याचे चित्र आज तरी हातकणंगले मतदारसंघात दिसत आहे.
पुनर्रचित हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे दोन लाख एकाहत्तर हजार चारशे बेचाळीस इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे कॉंग्रेसअंतर्गतच आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे आणि आमदार महादेवराव महाडिक गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. १९९९ च्या निवडणुकीत निवेदिता माने यांनी तत्कालीन खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव केला होता, तर २००४ च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेस एकत्रित लढताना खासदार माने यांनी शिवसेनेच्या संजय पाटील यांचा सुमारे एक लाख मतांनी पराभव केला होता.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे माने यांची उमेदवारी सर्वांत प्रथम जाहीर झाली. त्यामुळे सर्वांच्या अगोदरच प्रचारालाही सुरवात केली. परंतु त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा करत आमदार आवाडेंनी बंड पुकारले. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यशस्वी शिष्टाई करत आवाडेंचे बंड थोपवण्यात यश मिळविले. तिकडे आमदार महाडिकांनीही राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु खासदार माने, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे व आमदार महाडिक यांची दिलजमाई करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळाले. त्यामुळे श्रीमती माने यांना निवडणूक एकतर्फी वाटू लागली. मात्र ऊसदर आंदोलन, दूध दर यांसारख्या चळवळीतून शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या आमदार राजू शेट्टी यांनी श्रीमती मानेंच्या विरोधात दंड थोपटले. त्यांच्या सभांनाही आता उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माने यांना विजय तितकासा सोपा राहिलेला नाही.
अशातच गृहमंत्री जयंत पाटील यांनी वडगावच्या सभेत जनसुराज्यची पाठराखण केल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली. त्यावर मंत्री पाटील यांनी हातकणंगलेत येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नेते एकत्र आले असले तरीही कॉंग्रेस व जनसुराज्यचे कार्यकर्ते प्रचारात कुठेही आघाडीवर दिसत नाहीत, हे वास्तव आहे. मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य, बेरोजगारी यांबरोबरच पंचगंगा नदीचे प्रदूषण, सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आपण काय केले, किंवा काय करणार आहे? याबाबतचे ठोस मुद्दे एकाही नेत्याच्या भाषणात दिसत नाहीत. उलट वैयक्तिक टीका-टिप्पणीवरच अधिक भर दिसत आहे. आमदार शेट्टींचाही प्रचार ऊस, दूध दर आणि शरद पवारांवरील टीका याभोवतीच फिरत आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी कोण काय करणार आहे, हाच प्रश्न मतदारांतून विचारला जात आहे.
अनिल कानडेंच्या रूपाने प्रथमच बसपने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याही सुरवातीच्या सभांमध्ये श्रीमती माने यांच्या घराणेशाहीवर, कामकाजावर जोरदारपणे अनेक वक्त्यांनी टीका केली. परंतु दोनच दिवसांत काय जादू झाली कोण जाणे. बसपच्या प्रचारात आज मानेंच्या विरोधात एक “ब्र’ही काढला जात नाही. त्यामुळे बसपचे अनिल कानडे आपले स्वतंत्र अस्तित्व राखणार की बसपचा हा “हत्ती’ श्रीमती मानेंच्या तंबूत जाऊन चारा खाणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. रघुनाथदादा पाटील प्रचारासाठी गाव न् गाव पिंजून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सुरवातीपासूनच मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य कमी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील वातावरण अद्याप तरी थंड आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शेतकरी वर्गाच्या मतांची फाटाफूट होणार हे निश्चित आहे. त्याचा फायदा अर्थातच श्रीमती माने यांना होणार आहे.
एकूणच या मतदारसंघात राजू शेट्टींच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून हे सर्व नेते शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार का? नेते प्रामाणिक राहिले तरीही कार्यकर्ते काय करणार? यावरच या निवडणुकीचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते
राष्ट्रवादी – ७३१३९
शिवसेना – ५८७५८
अपक्ष – ८८१९