आमदार शेट्टींचा शक्तिप्रदर्शनाने अर्ज
कोल्हापूर – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शनासाठी दसरा चौकातून काढलेल्या त्यांच्या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या सहभागी होत्या. गाड्यांवर पक्षाचे ध्वज व ऊस लावले होते. श्री. शेट्टी या मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या श्री. शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रचार प्रारंभ येडेमच्छिंद्र येथून केला. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष व स्वाभिमानी पक्षाकडून असे दोन अर्ज दाखल केले आहेत. या वेळी त्यांच्यासोबत इचलकरंजीचे कॉ. प्रताप होगाडे, डाव्या चळवळीतील कोल्हापुरातील कार्यकर्ते कॉ. चंद्रकांत यादव, ए. बी. पाटील उपस्थित होते. कॉ. होगाडे यांनीच त्यांचा अर्ज भरला. निवडणूक निर्णय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी अर्ज स्वीकारला. सहायक निवडणूक अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
तत्पूर्वी शक्तिप्रदर्शनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. दसरा चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीत बैलगाड्यांचा समावेश लक्ष वेधून घेत होता. बैलांनाही सजवले होते. दसरा चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे निवासस्थानमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरवणूक येताच कार्यकर्त्यांनी श्री. शेट्टी व पक्षाच्या विजयाच्या घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला. सावकार मादनाईक, उल्हास पाटील, सदाभाऊ खोत आदी संघटनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. “एक व्होट व एक नोट’ या विधानसभा निवडणुकीतील सूत्रानुसार मी निवडणूक लढवणार आहे. माझ्यासारखा चारित्र्यसंपन्न, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारा खासदार लोकांना हवा असेल तर लोकांनीही मला काही तरी दिले पाहिजे. माझ्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्या गावांत प्रचारसभा त्या गावांत लोक स्वखुशीने निवडणूक निधी देतात.”
संपत्ती केवळ १९ लाख –
आमदार शेट्टी म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत माझी संपत्ती ११ लाख ९५ हजार रुपये होती. यावेळी ती १९ लाख ७७ हजार रुपये झाली आहे. त्यात आमदार म्हणून मिळालेले वेतन, भत्ते या स्वरूपातील पाच लाख रुपयांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून रिंगणात उतरलो असून विधानसभेप्रमाणेच लोक मला भरघोस मतांनी विजयी करतील.”