आर. आर. पाटील यांनी तोंड मिटलं तर बरं…
इचलकरंजी – “आर. आर. पाटील यांनी तोंड मिटलं तर बरं, नाहीतर दूध दरवाढप्रश्नी बंद खोलीत झालेली चर्चा उघड केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्या लोकशाही आघाडीचे उमेदवार आमदार राजू शेट्टी यांनी दिला. येथील अण्णा भाऊ साठे मैदानात जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य ए. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. माझ्या डिपॉझिटची चिंता करू नका. ते हरामाचे पैसे नाहीत; कष्टाचे आहेत, अशा शब्दांत त्यांनी आर. आर. पाटील यांना सडेतोड उत्तर दिले.
आर. आर. यांचा श्री. शेट्टी यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “”दूध दरवाढीबद्दलची बंद खोलीतील चर्चा उघड केली आणि दरवाढीस कोणाकोणाचा विरोध होता, यांची नावे जाहीर केली तर पक्षात तुमचे शत्रू जास्त होतील. चळवळीला डिवचायला निघाला तर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला अडचण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही, हे लक्षात ठेवा.” उपस्थित नागरिकांनी बंद खोलीतील चर्चा उघड करा, अशी मागणी केली. पण आपण विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे स्पष्ट करीत त्यास त्यांनी नकार दिला.
श्री. शेट्टी म्हणाले, “”शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना महाराष्ट्रात चाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. साखर कारखानदारीला आम्ही शिस्त लावली; पण पवारांच्या कृपेने ज्या ठिकाणी चळवळ नाही, तिथे कारखानदारी मोडीत निघत आहे. माझ्या संपत्तीची सीबीआयमार्फत चौकशी कधीही करा. माझ्या संपत्तीची चौकशी झाल्यानंतर माझ्या शेजाऱ्यांचीही चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. ही मागणी यापूर्वीही विधानसभेत केली आहे. मी स्वच्छ हाताने जन्माला आलो आणि स्वच्छ हाताने जाणार आहे.”
ते म्हणाले, “”कोल्हापूर-कोकण रेल्वे जोडण्यासाठी व डेक्कनच्या कामगारांचा प्रश्न, ऊसतोड मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आजच्या सभेची उपस्थिती प्रस्थापितांना धडकी भरविणारी आहे. या सभेतून सुरू झालेलं वादळ हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर कब्जा केल्याशिवाय राहणार नाही.”
“स्वाभिमानी’चे राज्याध्यक्ष सदाभाऊ खोत, प्राचार्य पाटील, प्रा. सुभाष जाधव, तिसऱ्या आघाडीचे राज्य निमंत्रक प्रताप होगाडे, सूर्याजी साळुंखे, भारती प्रभावळे, पद्माकर तेलसिंगे, नजीर मोमीन, बशीर जमादार, आनंदराव चव्हाण, हणमंत लोहार, जालिंदर पाटील, शंकर मंडलिक, दिलीप पोवार, रेखा पाटील आदींची भाषणे झाली.
उत्स्फूर्त मदत
राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी सभेत उत्स्फूर्त मदतनिधी देण्यात आला. अकिवाट शेतकरी संघटनेकडून 51 हजार, चिंचवाड शाखेकडून 51 हजार, गणेशवाडी शाखेकडून 60 हजार, शेडशाळ येथील मगदूम गुरुजींकडून 25 हजार रक्कम जमा झाली.
राष्ट्रवादी लक्ष्य
आजच्या सभेत सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यांच्या नेतेमंडळींवर टीकेची झोड उठवली. शिवसेनेचे उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी आपल्या प्रचारात श्री. शेट्टी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यात श्री. शेट्टी यांच्यावर टीका केली; मात्र त्यांचा साधा नामोल्लेख कोणत्याच वक्त्याने केला नाही.