दुकानदारी मांडली नाही म्हणून निवडून आलो – खासदार राजू शेट्टी
सांगली – लोकसभा निवडणुकीत मी निवडून आलो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला, हा धक्का जलसंपदा मंत्री अजित पवार आणि गृहमंत्री जयंत पाटील यांना सहन झाला नाही, त्यातून ते सावरलेही नाहीत, त्यामुळेच लोकांनी मला काय म्हणून निवडून दिले? असा सवाल ते करत आहेत; मी साखर कारखाना, दूध संघ, बॅंक काढली नाही; मात्र उसाचे, दुधाचे आणि शेतीमालाचे अर्थकारण राबणाऱ्या हजारो लोकांना समजाविले, त्यांचा स्वाभिमान जागा केला, टक्केवारीचा धंदा कधाच केला नाही, राजकीय दुकानदारीही मांडली नाही म्हणून निवडून आलो, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मारला.
येथील जुने स्टेशन चौकात ही सभा झाली. ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम अध्यक्षस्थानी होते. सभेला मोठी गर्दी होती. ते म्हणाले, ”लोकांचा माझ्यावर व माझ्या कामावर विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी मला निवडून दिले आहे. मी आता कोणाकडूनही पराभूत होणार नाही. माझ्यावर डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नका, केल्यास हे करपलले चेहरे तुम्हाला अद्दल घडवतील.”
ते म्हणाले, ”सहकार खात्याने मांडलेल्या विधेयकावर विधिमंडळात चर्चा झाली, त्यावेळी मी पांढऱ्या कपड्यातील सारे दरोडेखोर आहेत, असा आरोप केला, तेव्हा सत्ताधारी व विरोधकही अंगावर धावून आले. त्यांनी माझ्या वक्तव्याला हरकत घेतली. त्यांना मी म्हणालो ”मी सुद्धा पांढऱ्या कपड्यातच आहे मला राग येत नाही; मग तुम्हाला का राग येतो. याचाच अर्थ तुम्ही दरोडेखोर आहात” यांची राजकीय दुकानदारी बंद पडत नाही, तोपर्यंत लोकांना सुख लागणार नाही आणि प्रश्नही सुटणार नाहीत. राजकारण हे त्यांचे जगण्याचे साधन आहे, म्हणून ते बंद पाडण्यासाठी पुढे आलो आहे.”
मी पाटलाच्या वाड्यावर जाऊन सभा घेण्याचे नाटक करून त्यांच्यासमोर पैशाच्या बॅगा फेकल्या नाहीत, तर वाडी-वस्तीवर, गल्ली बोळात गेलो, गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील बहाद्दूरवाडी गावात प्रचारासाठी गेलो होतो, तिथे भंगारवाला भेटला, त्यांने मला अडवून मळलेली 50 रुपयांची नोट निवडणुकीसाठी दिली. कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मित्रासमवेत चहा घेण्यासाठी गेलो होतो. चहाचे पैसे देत असताना हॉटेल मालकाने वेटरनी वर्गणी काढून बिल दिल्याचे सांगितले. यावरून ओळखा मी कसा निवडून आलो असे ते म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात तळ ठोकला होता. त्यांनी राजू शेट्टींचा हा भस्मासूर गाडा असा प्रचार सुरू केला होता; परंतु लोकांनीच भस्मासूर कोण आहे हे दाखवून दिले. मला सत्ताधीश व्हायचे नाही, कारखाने, बॅंका, पतसंस्था, शिक्षण संस्था यामध्ये लोकांचे शोषण करणाऱ्यांना बांडगुळांना धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही; पण मी काही सुपरमॅन नाही. येत्या विधासनसभेच्या निवडणुकीत या भ्रष्ट सत्ताधीशांना गाडण्यासाठी साथ द्या, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले.
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील म्हणाले, ”श्री. शेट्टी यांची सध्या लाट आहे. त्यांच्या रूपाने परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात आम्ही सारे मिळून परिवर्तन घडवू. या वेळी सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री जंयत पाटील यांच्यावर जोरदार हल्लबोल केला. राज्याचा गृहमंत्री आमच्यामुळे दीड महिना वाळव्यातच अडकून पडला, इतके करूनही त्यांना यश आले नाही हे वेगळेच.
या वेळी बापूसाहेब मगदूम, अरुण माने, शंकर पुजारी, शिवाजीराव शिंदे, शिवाजीराव परुळेकर, प्रा, अमर कांबळे यांची भाषणे झाली. प्रा. पाटील यांनी श्री. शेट्टी यांचा सत्कार केला. ऍड. के. डी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयपाल चौगुले यांनी आभार मानले. रिमझिम पाऊस असतानाही सभेला मोठी गर्दी होती.
————————-
आबा घाम विसरले
श्री. शेट्टी यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवरच जोरदार टीका केली. आर. आर. आबांनीही माझ्यावर हल्लाबोल केला. आबाही कष्टातून वर आले आहेत. त्यांनी घाम गाळल्याने उच्च पदापर्यंत पोचले; पण ते घामाला विसरले त्यामुळे त्यांचे गृहमंत्रिपद गेले. त्यांची प्रतिमा आता विदूषकाची झाली आहे असे ते म्हणाले.
————————-
‘ करपलेल्या चेहऱ्यांचा मी प्रतिनिधी आहे. मी कोणाला विकलो नाही आणि घाबरलो नाही बदल्यांचा बाजार मांडला नाही म्हणूनच मला हातकणंगले मतदारसंघातील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले. मी कसा निवडून आलो हे अजित पवार, जयंत पाटील यांना कधीच कळणार नाही.”
– खासदार राजू शेट्टी