लाल निशाण पक्षाचा राजू शेट्टींना पाठिंबा
कोल्हापूर – लाल निशाण पक्षाने (लेनिनवादी) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. धनदांडग्यांच्याविरोधात व जातीय शक्तीच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शेट्टी यांना विजयी करा, असे आवाहन पक्षाचे अतुल दिघे यांनी केले आहे.
पक्षातर्फे शिरोली, रेंदाळ, हुपरी, इचलकरंजी, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, वाळवा परिसरात प्रचार केला जाणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस भांडवलदारांचे समर्थक असून त्यांच्या आर्थिक धोरणामुळे कंत्राटीकरण, खासगीकरण वाढले आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी भांडवलदारांचे धंदे वाढावेत यासाठी केली आहे. शिवसेनेचे उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी सांगली भागात संस्था काढून ती बुडवली व कर्ज वसुली होऊ नये म्हणून जिल्हा बॅंकेवरच दगडफेक केली. कर्ज बुडवा, पतसंस्था बॅंका बुडवा म्हणणारे पाटील शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या ग्रामीण सावकारांचे हस्तक आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमदार शेट्टी यांना पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतल्याचे दिघे यांनी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकावर सुशीला कुलकर्णी, रमेश खोडे, सर्जेराव खुपिरे, सुवर्णा तळेकर आदींच्या सह्या आहेत.