साखर भाववाढीने शेतकरी, ग्राहकांची लूट – राजू शेट्टी
साखर भाववाढीने शेतकरी, ग्राहकांची लूट – राजू शेट्टी
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 25th, 2009 AT 11:09 PM
दौंड – “केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे झालेल्या साखर भाववाढीने ठराविक राजकारणी आणि दलालांचा फायदा झाला असून, ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची मात्र लूट झाली आहे,” अशी टीका “स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, “”साखरेच्या भाववाढीचे संकट अचानक निर्माण होत नाही. उसाची लागवड पंधरा ते सोळा महिने अगोदर केली जात असल्याने देशांतर्गत उसाचे उत्पादन, संभाव्य साखरनिर्मिती आणि मागील हंगामातील शिल्लक साखरेचा सरकारकडे पूर्ण तपशील उपलब्ध असतानाही चुकीच्या पद्धतीने साखरेची आयात-निर्यात केली जात आहे. साखरेच्या भाववाढीमागे विशिष्ट घटक कार्यरत असून, दरवाढीचा ऊस उत्पादकांना कोणताही लाभ झालेला नाही. साठेबाजी आणि भाववाढ रोखण्यात अपयश आल्याने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे मी पत्राद्वारे या साखर गैरव्यवहाराची तपशीलवार माहिती देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती; परंतु पंतप्रधानांच्या कार्यालयाने पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्यदेखील दाखविले नाही.”
ते पुढे म्हणाले, “”जनतेची इच्छा आणि लोकांच्या रेट्यामुळे एक अपरिहार्य बाब म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली. सत्ताधाऱ्यांना पराभूत करणे हे चळवळीतील सोळा पक्षांचा समावेश असलेल्या तिसऱ्या आघाडीचे एकमेव समान ध्येय आहे. तिसऱ्या आघाडीस राज्याच्या राजकारणाच्या समीकरणांमध्ये बदल करण्याएवढ्या जागा निश्चित मिळतील.”
केंद्र सरकारने दिलेल्या 71 हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या निर्णयावर टीका करताना श्री. शेट्टी पुढे म्हणाले, “”दोन्ही कॉंग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या; परंतु तोट्यात असलेल्या जिल्हा सहकारी बॅंका, सेवा सहकारी संस्थांचे “एनपीए’चे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय या निर्णयाची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी होती की सहकारी संस्थांसाठी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यापेक्षा पॅकेजमध्ये अधिक रस आहे.”
“येणाऱ्यांची पावले दिसतील’
तिसऱ्या आघाडीतून डॉ. राजेंद्र गवई गट बाहेर पडल्याने आघाडीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करून खासदार राजू शेट्टी म्हणाले, “”आघाडीत सहभागी होणाऱ्यांची पावले दिसतील; परंतु बाहेर पडणाऱ्यांची पावले दिसणार नाहीत.’