स्वाभिमानी वारे
खासदार राजू शेट्टी, एक आश्वासक आणि नवा पर्याय म्हणून पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित होऊ पाहतोय. लोकसभेतील विजयानंतर त्यांचा वारू अधिकच वेगाने दवडू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीने पाठिंबा दिल्याने आता त्यांना या आघाडीचे महानेता म्हणून पुढे आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र राजू शेट्टी नावाची जादू संपूर्ण महाराष्ट्रात चालेल का ?
विधानसभा २००४ च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या एका उमद्या कार्यकर्त्याने शिरोळ मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. ऊसदराच्या प्रश्नांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली आंदोलने, शेतकऱ्यांना मिळवून दिलेला न्याय, यामुळे शेतकऱ्यांनी “राजू शेट्टी’ नावाच्या कार्यकर्त्याला डोक्यावर घेतले. लोकांनी निधी जमविला. त्यातून “एक नोट एक व्होट’ ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या भागात पाहण्यास मिळाली. त्यानंतरच्या चार वर्षांत त्यांनी संघर्ष कायम ठेवला. राजकारणात प्रस्थापित असलेल्या सहकारी साखर कारखानदारांबरोबरचा लढा लढता लढता त्यांनी दुधाच्या दराबाबत नवी लढाई लढली. त्यातून ते घराघरात पोचले. पश्चिम महाराष्ट्राचे हे दोन प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचे, घराघराच्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली त्यांनी लढलेल्या लढाईला यश मिळाले.
लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी त्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा हात घातला. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधातील मोट बांधण्यात ते यशस्वी झाले. त्यांना घरी बसविण्यासाठी रथीमहारथी एकत्रित आल्याचे चित्र तयार झाले. मात्र लोकसमूहाच्या ताकदीने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. ते विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. याच काळात स्वाभिमानी लाटेवर स्वार झालेले कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे बंडखोर नेते सदाशिवराव मंडलिक हेही यशस्वी झाले. लोकसभेच्या निकालानंतर आता “शेट्टी नावाचे स्वाभिमानी वारे’ पुन्हा वाहू लागले आहे. गावागावात सत्कार, आभाराच्या निमित्ताने विधानसभेची तयारीही सुरू आहे.
ऊसपट्ट्यात साखर कारखानदारांचा असलेला मालकशाहीपणा त्यांना भोवला, हे प्रथमदर्शनी कारण आहे. पिढ्यान्पिढ्या ?चिलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांनी नवी आर्थिक सबळता दिली आहे. असे असताना शेट्टी यांचा विजय कसा झाला, तर शेट्टींची प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची, त्यावर आंदोलन करण्याची पद्धती, ते तडीस लावण्याचा आग्रह आणि त्यातून झालेला शेतकऱ्यांचा फायदा, यातून त्यांच्याभोवती तयार झालेले वलय, प्रस्थापितांविरोधात उगारलेला आसूड आणि या सर्वांतून आपल्यासाठी काहीतरी करणारा कोणीतरी राजकारणी आहे याची झालेली तीव्र जाणीव यामुळे शेट्टी यांना यश मिळाले आहे.
आता विधानसभेच्या दिशेने त्यांची तयारी सुरू आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग त्यांच्या माध्यमातून सांगली, कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. चळवळीत अग्रेसर असलेले मात्र सध्या मागे पडलेले अनेक मोहरे पुन्हा शेट्टी फॅक्टरमुळे ताजेतवाने झाले आहेत. त्याहीपेक्षा शेट्टी यांना राजकीयदृष्ट्या लोकसभेच्या निवडणुकीत मदत केलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पैरा फिटेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघात स्वाभिमानी आणि मंडलिक यांची आघाडी असणार आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आणि सांगली जिल्ह्यातील किमान इस्लामपूर आणि शिराळा या दोन जागा स्वाभिमानीकडून लढविण्याची तयारी आहे. राजू शेट्टी यांच्या विजयातून आपणासही फायदा मिळेल, या हेतूने सांगली जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. आता शेट्टी किती लोकांना न्याय देणार, उरलेल्यांची कशी समजूत काढणार, हे प्रश्न आहेत. शेट्टी यांना जितका प्रतिसाद मिळाला तितका त्यांच्याकडून इच्छुक असलेल्यांना मिळणार का, हा प्रश्न आहे.
“स्वाभिमानी’ पक्ष होतोय!
विधानसभेनंतर शेतकरी संघटनेतून बाजूला झालेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. पाच वर्षांनंतर आता शेतकरी संघटनेपेक्षा स्वाभिमानी संघटना मजबूत झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ही स्वाभिमानी शेतकरी संघटना एक पक्षच झाली आहे. अधिकृत नोंदणी नसली तरी इच्छुकांकडून “स्वाभिमानी पक्ष’ असा शब्दप्रयोग ऐकण्यास मिळत आहे. प्रस्थापितांना धक्का देणाऱ्या या शब्दाची भुरळ श्री. शेट्टी यांच्यामुळेच अनेकांना लागली आहे.