होय, मी शेतकऱ्यांचे ओझे वाहणारा गाढवच
कोल्हापूर – राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार आयुष्यात प्रथमच खरे बोलले. होय, मी गाढव आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षांचे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे ओझे वाहून नेणारा मी गाढव आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केली. श्री. पवार यांनी काल झालेल्या जाहीर सभेत गाढवाची गोष्ट सांगून श्री. शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एका मिरवणुकीत सहभागी झालेल्या गाढवाला लोक आपल्यावर फुले टाकताहेत, असे वाटत होते; मात्र नंतर अंगावर काठ्या पडल्यावर ते ताळ्यावर आले. तशी शेट्टी यांची गत झाल्याचे श्री. पवार यांनी म्हटले होते. त्यावर शेट्टी म्हणाले, “”राष्ट्रवादीचे नेते आयुष्यात प्रथमच खरे बोलले. मी गाढव असल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले. होय, मी शेतकऱ्यांचे गाढव आहे. त्यांच्या आशा-आकांक्षाचे, चळवळीचे, समस्यांचे ओझे मी वाहतो आहे. कुंभाराच्या गाढवाप्रमाणे मी शेतकऱ्यांचे प्रामाणिक गाढव आहे. प्रामाणिकपणे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, गावगाढ्यातील सर्वसामान्यांसाठी गाढवासारखे राबणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होऊन त्यांचेच खाऊन त्यांच्यावर लाथा झाडणारे गाढव नव्हे. प्रामाणिक गाढवाचे महत्त्व कष्ट करणाऱ्यांना चांगलेच माहीत आहे. आयुष्यात प्रथमच खरे बोलल्याबद्दल नेत्यांना धन्यवाद द्यायला हवेत.”