पराभवाने खचलो नाही नव्याने लढा उभारणार
पराभवाने खचलो नाही नव्याने लढा उभारणार
राशिवडे बुद्रुक, जि. कोल्हापूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही, शस्त्रे खाली ठेवलेली नाहीत, ती नव्याने पाजळून पुन्हा सामोरे जाऊ. लोकसभा आणि विधानसभेसाठी नको असलेल्या करारावर सह्या केल्या, आता तसे होणार नाही.
उमेदवार आयात न करता सर्व निवडणुका स्वबळावरच लढवून यशस्वी होऊ. आता चळवळ गतिमान करून शेतीमालाला हमीभाव मिळविण्यासाठी जोमाने लढा असेल, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथे संघटनेच्या चिंतन शिबिराच्या समारोपप्रसंगी खासदार शेट्टी बोलत होते. दोन दिवस सुरू असलेल्या या चिंतन शिबिरामध्ये अनेकांनी स्पष्ट प्रतिक्रिया नोंदविल्या. चुकांची प्रांजळपणे कबुली देत आता पुन्हा जोमाने कामाला लागू या, असे आवाहन श्री. शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. आता उसासह विदर्भातील कापूस आणि सोयाबीनसाठी लढा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. शेतीमालाला भाव मिळविण्यासाठी लढा उभारूच; परंतु भाताला क्विंटलला दोन हजार, सोयाबीन व सूर्यफुलाला २५००, तर कापसाला तीन हजार रुपये हमीभाव, दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, असे ठराव करण्यात आले, ते एकमुखाने संमत करण्यात आले. उसाचे आंदोलन थांबलेले नसून, या हंगामासाठी ऊसदर देण्यासाठी सुरू असलेली चढाओढ ही आमचीच युक्ती आहे. दोन हजारांचा पहिला हप्ता खिशात टाकूनच तीन हजारांवर दर मिळविण्यासाठी आंदोलन छेडणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “”राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आम्ही यात उतरलो; पण चोहोबाजूंनी अपयशाचे खापर फोडताना होणारी टीका ऐकून मला लोकसभेचा राजीनामा द्यावा, हे मनाला शिवले; पण ऊस परिषदेने पुन्हा बळ आले. शेतकरी राजकारणापासून दूर होते. त्यांचे काय होणार, हा विचारही मनात आला. आता पुन्हा लढण्याची उमेद आली आहे.”
ते म्हणाले, “”या निवडणुकीत आम्ही काही चुकीचे निर्णय जरूर घेतले; पण यातही विचार होता. शिराळ्यात केलेली मदत याच भावनेतून होती. शिवसेनेशी आम्ही कुठेच युती केली नाही, प्रसारमाध्यमांनी मात्र याचा बागुलबुवा केला. संघटनेच्या ध्येय-धोरणांच्या विरोधात वागू लागलो, तर इतरांच्यात आणि आमच्यात फरक काय? आता येत्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज व्हा. कुणा प्रस्थापिताला गाडण्यासाठी कुणाला तरी वर काढू नका. केलेली चूक पुन्हा करायची नाही.”
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, महावीर अक्कोळे यांची भाषणे झाली. विठ्ठल महाडेश्वर, अविनाश मगदूम, वासुदेव पाटील, सतीश पाटील, श्रीवर्धन पाटील, सर्जेराव पाटील, सावकार मादनाईक, बी. राजू आदींसह पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांनी परखड मते मांडली.
चळवळीत दोन्ही कॉंग्रेस टिकत नाहीत आणि आम्ही पैशांपुढे टिकत नाही; म्हणून त्यांच्या व्होट बॅंकेला खिंडार पाडण्यासाठी आम्ही रामदास आठवले यांना जवळ केले. विजय जवळ येईल, असे वाटत होते; पण हवी तशी विश्वासार्हता राज्यात निर्माण झाली नाही. – खासदार राजू शे